कपाशीवरील बोंडअळ्यांचे एकीकृत व्यवस्थापन

 कपाशीवरील बोंडअळ्यांचे एकीकृत व्यवस्थापन 

कपाशीवरील बोंडअळ्यांचे एकीकृत व्यवस्थापन
कपाशीवरील बोंडअळ्यांचे एकीकृत व्यवस्थापन

अ ) मशागतीय पद्धती : 

१) कपाशीची शेवटची वेचणी संपल्यावर शेतात लगेच गुरे ( विशेषतः शेळ्या – मेंढ्या ) चारावी .

२)पहाटीची धसकटे व इतर पालापाचोळा जमा करून जाळावा . 

३)शक्य असल्यास जमिनीची खोल नांगरट करावी .

 ४). पहाट्यांचे ढीग शेतात तसेच न ठेवता गावाजवळ ठेवावेत आणि पावसाळ्यापूर्वी त्यांचा जाळण्यासाठी उपयोग करावा . 

५)कपाशीचे दुबार पीक किंवा खोडवा घेण्याचे टाळावे  तसेच भेंडी , अंबाडी ही पिके कपाशीच्या शेतालगत घेण्याचे टाळावे . 

६) पेरणी करताना किडींना कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या जातींची निवड करावी . 

७) प्रमाणित बियाण्याचा वापर करावा . 

८) पिकांची फेरपालट करावी . कपाशीनंतर भेंडीसारखी पिके घेऊ नयेत . 

९) किडींचे पर्यायी खाद्य असलेली तणे उदा . कपाळफोडी , पांढरीफुली , सिडा , हिबीसकस इ . यांचा नाश करावा . 

१०) पेरणीपूर्वी बियाण्याला किटकनाशकांची बीज प्रक्रिया करून पेरावे म्हणजे पीक उगवणीनंतर ३० ते ४५ दिवसपर्यंत रस शोषक किडीपासून पीक संरक्षित ठेवता येईल . 

११) संपूर्ण गावातील पेरणी कमीत कमी वेळेत , वेळेवर व सामूहिक पद्धतीने करावी . 

१२) जैविक घटकांच्या संवर्धनासाठी कपाशीच्या शेतात चवळी व मक्याच्या काही ओळी तर बांधावर एरंडी लावावी . 

१३) पिकाच्या सुरुवातीच्या काळात ठिपक्याचे बोंडअळीग्रस्त शेंडे तसेच शेंदरी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट करावेत . 

१४) हिरव्या बोंडअळीच्या मोठ्या अळ्या आढळल्यास त्या वेचून नष्ट कराव्यात .

ब ) कीड प्रतिकारशक्ती असणाऱ्या जातींचा वापर : 

किडींना प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा . 

 क ) जैविक नियंत्रण : 

बोंडअळ्यांचे जैविक नियंत्रण करण्यासाठी जीवाणू ( बी.टी. म्हणजेच बॅसीलस थुरीनजीएंसीस ) , विषाणू ( एच.ए.एन.पी.व्ही . ) , काही बुरशी , तसेच विविध प्रकारच्या परोपजीवी , परभक्षक किटकांचा ( उदा . ट्रायकोग्रामा , क्रायसोपा इ . ) समावेश होतो . हिरव्या बोंडअळीसाठी एच.ए.एन.पी.व्ही . या विषाणूचा वापर करता येईल . यासोबत किटकनाशकाची अर्धी मात्रा वापरल्यास अधिक फायदा होतो . त्याचप्रमाणे बोंडअळ्यांसाठी ट्रायकोग्रामा हा अंड्यावरील परोपजीवी किटक उपलब्ध असल्यास त्याचा वापर करावा . 

ड ) वनस्पतीजन्य पदार्थाचा वापर :

निंबोळी अर्क ५ टक्केचा परोपजीवी किटकांवर विपरीत परिणाम न होता बोंड अळ्यांचे प्रमाण कमी करता येते . या अर्कासोबत शिफारस केलेल्या किटकनाशकाची अर्धी मात्रा मिसळल्यास प्रभावी ठरते . 

इ ) फेरोमोन्सचा वापर : 

बोंडअळ्यांच्या सर्वेक्षणासाठी फेरोमोनचा वापर करावा . ठिपक्याच्या बोंडअळीसाठी व्हिटॅल्यूर , हिरव्या बोंडअळीसाठी हेलील्यूर किंवा हेक्झाल्यूर आणि गुलाबी बोंडअळीसाठी गॉसीप्ल्यूर हे फेरोमोन्स उपलब्ध आहेत . एका हेक्टर क्षेत्रात साधारणपणे चार ते पाच फेरोमोन्स सापळे ( प्रत्येक प्रकारचे ) बसवावेत . सापळ्यात अडकलेले नर पतंग दररोज काढून मोजून मारावेत . प्रत्येक सापळ्यामध्ये २-३ दिवस सतत ८-१० पतंग आढळून आल्यास पीक संरक्षण उपाय योजावेत . 

फ ) रासायनिक किटकनाशकांचा वापर :

एकीकृत कीड व्यवस्थापनेतील विविध पद्धतींचा अवलंब केल्यानंतरही किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास निवडक रासायनिक किटकनाशकांची उपाययोजना करावी . सतत एकच एक किटकनाशक वापरू नये .

Leave a Comment