कापसा वरील रस शोषण करणाऱ्या किडी व बोंडअळ्या

कापसा वरील रस शोषण करणाऱ्या किडी व बोंडअळ्या

रस शोषण करणाऱ्या किडी
रस शोषण करणाऱ्या किडी

अ ) रस शोषण करणाऱ्या किडी :


१ ) तुडतुडे :

तुडतुडे फिक्कट हिरव्या रंगाचे , पाचरीच्या आकाराचे असून ते नेहमी लांबीला तिरके चालतात . तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात . प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून पानातील रस शोषण करतात . त्यामुळे पाने प्रथम कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात . जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने लाल तांबडी होऊन त्यांच्या कडा मुरगळतात , परिणामी झाडांची वाढ खुंटते , झाडांना पात्या , फुले आणि बोंडे कमी प्रमाणात लागतात . कोरडवाहू कापूस पिकावर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतो . अधिकत्तम प्रादुर्भाव ऑगष्टचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या कालावधीत आढळून येतो .

२ ) मावा :

मावा रंगाने पिवळसर किंवा फिक्कट हिरवा असतो . मावा कोवळ्या डहाळीवर किंवा पानाच्या खालच्या बाजूने समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात . तसेच आपल्या शरीरातून चिकट द्रव बाहेर टाकतात आणि त्यावर काळी बुरशी वाढते . त्यामुळे पानांद्वारे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा उत्पन्न होते . मावा किडीचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास पाने कोकडतात आणि झाडाची वाढ खुंटते . कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु होतो . अधिकत्तम प्रादुर्भाव जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगष्टचा दुसरा आठवडा आणि पिकाच्या शेवटी डिसेंबर जानेवारी महिन्यात आढळून येतो .

३ ) फुलकिडे :

फुलकिडे रंगाने फिक्कट पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे असून आकाराने लहान व लांबट असतात . प्रौढ व पिल्ले कपाशीची पाने आणि हिरवी बोंडे खरडून त्यातून निघणारा रस शोषण करतात . त्यामुळे पानावर प्रथम पांढुरके चट्टे व नंतर तपकिरी ठिपके दिसून येतात . कोरडवाहू कापूस पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे ऑगष्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून सुरु होतो . अधिकत्तम प्रादुर्भाव सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात आढळून येतो .

४ ) कोळी :

कोळी दोन प्रकारचे असतात . एक वुली कोळी व दुसरे लाल कोळी . हे पानातील रस शोषण करतात . लाल कोळींनी रस शोषण केलेली पाने लालसर तांबडी होतात तर वुली कोळींनी रस शोषण केलेल्या पानांवर पांढुरके केसाळ चट्टे पडतात . या किडीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कापूस पिकावर सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आढळून येतो .

५ ) पांढरी माशी :

पांढरी माशी आकाराने अगदी लहान असून पंख पांढुरके किंवा करड्या रंगाचे असतात . शरीरावर पिवळसर झाक असून डोक्यावर मध्यभागी दोन तांबडे ठिपके असतात . पांढऱ्या माशींची पिल्ले पानाच्या मागच्या बाजूने एका ठिकाणी स्थिर राहून पानातील रस शोषण करतात . त्यामुळे पाने कोमेजतात . तीव्र स्वरुपाचा प्रादुर्भाव असल्यास पाने लालसर ठिसूळ होऊन वाळतात . याशिवाय पिल्ले शरीरातून चिकट द्रव बाहेर टाकतात , त्यावर काळी बुरशी वाढते . असे प्रादुर्भावग्रस्त झाड चिकट व काळसर होते . झाडाची वाढ खुंटते आणि त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो . कोरडवाहू कपाशीवर या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होतो . नोव्हेंबर महिन्यात अधिकत्तम प्रादुर्भाव आढळून येतो .


ब ) बोंडअळ्या :

बोंडअळ्या
बोंडअळ्या


१ ) ठिपक्याची बोंड अळी :

अळीचा रंग करडा असून डोके गर्द रंगाचे असते . अंगावर बरेच काळे व बदामी ठिपके असतात . कपाशीला पात्या येण्याचे अगोदर ही अळी प्रथम कोवळ्या शेंड्यांना छिद्र पाडून पोखरून खाते . त्यामुळे असे शेंडे सुकून नंतर वाळतात . पात्या आल्यावर अळी पात्या , कळ्या , फुले आणि बोंडांना नुकसान पोहचविते . त्यामुळे त्यांची गळ होते .

२ ) हिरवी बोंड अळी :

अळी रंगाने हिरवट असून तिच्या कडेला तुटक तुटक गर्द करड्या रेषा असतात . लहान अळ्या पात्या व कळ्यांना नुकसान पोहचवितात . मोठ्या अळ्या बोंडांना छिद्र पाडून आतील भाग खाऊन पोकळ करतात . या अळीने केलेली छिद्रे अनियमित गोल व तुलनात्मकदृष्टया मोठी असतात . बरेचदा अळीचा अर्धा भाग बोंडाच्या बाहेर असतो .

३ ) गुलाबी बोंड अळी :

अंड्यातून निघालेली अळी रंगाने पांढुरकी तर पूर्ण वाढलेली अळी गुलाबी रंगाची असते . अळी फुले व हिरव्या बोंडांना नुकसान पोहचविते . ज्या फुलांमध्ये ही अळी असते , अशी फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात , यालाच ‘ डोमकळी ‘ म्हणतात .

या अळीचा प्रादुर्भाव बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो . अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर हे छिद्र बंद होते . त्यामुळे बोंडाचे वरून निरीक्षण केल्यानंतर सुद्धा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही . अळी अवस्था बोंडामध्ये पूर्ण झाल्यानंतरच ही अळी कोषावस्थेत जाण्यासाठी बोंडाला छिद्र करून बाहेर पडते . अशी प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच फुटतात . त्यामुळे कापसाची प्रत बिघडते . गुलाबी बोंडअळी बोंडात राहून सरकीचेही नुकसान करते . त्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती आणि तेलाच्या प्रमाणात घट होते


Leave a Comment