गांडूळ खत ( व्हर्मी कम्पोस्ट )

  गांडूळ खत 

गांडूळ खत ( व्हर्मी कम्पोस्ट )
गांडूळ खत ( व्हर्मी कम्पोस्ट )

 रासायनिक खताला पर्याय आणि जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी गांडूळ खताचा  विविध पिकांसाठी जोरखत म्हणून उपयोग करावा 

गांडूळ खत ( व्हर्मी कम्पोस्ट ) म्हणजे काय ? 

   यामध्ये गांडूळाची विष्ठा , नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ , गांडूळाचे अंडीपुंज ( ककून्स ) , त्यांच्या बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असतो 

गांडूळ खत तयार करण्याची सुलभ पद्धत : 

गांडूळ खत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहे . त्यापैकी शेतात किंवा गोठ्याच्या आवारात तात्पुरते छप्पर उभारून जमिनीवर गादी वाफे तयार करून मोठ्या प्रमाणात गांडूळ खताची निर्मिती करता येते . यामध्ये आयसेनिया फिटीडा किंवा युड्रीलस युजेनिया या पृष्ठभागावर कार्य करणाऱ्या गांडूळाच्या जातींचा वापर करण्यात येतो : 

   या पद्धतीमध्ये हवेशीर परंतु गांडूळाचे उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी साध्या गवती किंवा बांबूच्या ताट्यांपासून तयार केलेल्या तात्पुरते छप्पराची आवश्यकता असते . पावसाळ्यात आत पाणी शिरू नये म्हणून छप्पराला प्लॅस्टिक किंवा ताडपत्री लावणे आवश्यक आहे . 

त्याचप्रमाणे गांडूळ खत निर्मितीसाठी गांडूळाचे आवडते खाद्य उदा . गुराढोरांचे शेण , बकऱ्या आणि मेंढ्यांच्या लेंड्या , घोडा – गाढवांचे लीद , शेतातील निरुपयोगी सेंद्रीय पदार्थ , पालापाचोळा , भाज्या आणि फळांचे टाकाऊ भाग तसेच वाचलेले अन्नपदार्थ इत्यादी जमा करावेत , ही पूर्वतयारी केल्यानंतर गांडूळखत निर्मितीसाठी खालील पद्धत अंमलात आणावी . 

१. गांडूळासाठी गादी वाफे ( बेड ) तयार करणे . 

तात्पुरते छप्पर उभारल्यानंतर त्याखालील जागेवरील माती ५ ते ६ सें . मी . खोदून मोकळी करावी . त्यावर ७ ते १० सें.मी. उंचीचा पाऊण ते एक मिटर रुंद आणि आवश्यकतेनुसार लांबीचे एक किंवा अनेक गादी वाफे तयार करावे . दोन वाफ्यामध्ये साधारणपणे ३० सें.मी. अंतर ठेवावे . गादी वाफा तयार करण्यासाठी उसाची वाळलेली पाने , चिपाड , वाळलेले गवत , पालापाचोळा किंवा शेतातील इतर टाकाऊ सेंद्रीय पदार्थ यांचा प्रथम ५ ते ६ सें.मी. जाडीचा थर द्यावा . त्यावर कुजलेल्या शेणखताचा पातळ थर द्यावा . अशा त – हेने तयार केलेले गादी वाफे वर्षभर वापरता येतील . 

२. गांडूळासाठी खाद्य पदार्थांचे मिश्रण तयार करणे 

   हे मिश्रण छप्पराच्या बाहेर मोकळ्या जागेत तयार करावे . त्यासाठी ४ ते ५ दिवसापूर्वी गोळा केलेले गुराढोरांचे शेण किंवा इतर प्राण्यांची विष्ठा अर्धा भाग आणि घरादारांतील किंवा शेतातील टाकाऊ संद्रीय पदार्थ अर्धा भाग घेऊन ते फावड्याच्या सहाय्यान एकत्र मिसळावे . त्यावर थोडे पाणी टाकून , गोवऱ्या थापता येतील इतपत खाद्यमिश्रण मऊ कराव 

३. खाद्यपदार्थांचे मिश्रण गादी वाफ्यावर टाकणे . 

   तयार केलेले खाद्यमिश्रण लहान घमेल्याच्या सहाय्याने गादी वाफ्यावर टाकावे त्यासाठी प्रथम दोन घमेले वाफ्यावर पालथे घालून , हे दोन्ही ढीग एकमेकाला जोडून राहतील याची काळजी घ्यावी . त्यानंतर पुन्हा एक घमेले दोन्ही ढिगांच्या मधोमध वरील बाजूला टाकून तिसरा ढीग टाकावा . अशारितीने लांबीच्या दिशेने खाद्य मिश्रण टाकत जावे

 ४. खाद्यमिश्रणावर गांडूळ किंवा ताजे गांडूळखत टाकणे . 

साधारणपणे प्रत्येक पांच घमेले खाद्य मिश्रणावर १०० गांडूळ किंवा १ किलो ताजे गांडूळ खत ( अंडी / पिल्लेयुक्त ) टाकावे . 

५. खाद्य मिश्रणावर गवत किंवा जुनाट पोत्यांचे आच्छादन टाकणे 

  गादी वाफ्यावर खाद्य मिश्रण टाकून झाल्यावर त्याच्या सर्व बाजू झाकण्यासाठी वाळलेले गवत किंवा जुनाट पोत्यांचा वापर करावा . त्यामुळे मिश्रण ओलसर राहील आणि पक्षांपासून गांडूळांना संरक्षण मिळेल . हे आच्छादन मधून मधून बाजूला सारुन खाद्य मिश्रणात गांडूळाची वाढ होते किंवा नाही हे पहावे . शिवाय आत गांडूळाचे नैसर्गिक शत्रू ( उदा . बेडूक , उंदीर , साप , पाली वगैरे ) आढळल्यास त्यांचा बंदोबस्त करावा 

६. खाद्य 

   खाद्य मिश्रण माफकपणे ओलसर ठेवण्यासाठी उन्हाळ्यात किमान दोन वेळा ( सकाळी व संध्याकाळी ) आणि इतर दिवसात एक वेळा झारीने ( आच्छादनावर ) पाणी घालावे . हे पाणी वाफ्याच्या आजुबाजूला उतरणार नाही याची काळजी घ्यावी 

७. गांडूळखत तयार झाल्यानंतर त्यापासून गांडूळ वेगळे करणे . 

   ह्या पद्धतीप्रमाणे गांडूळ खत तयार होण्यासाठी सुरुवातीला ४० ते ४५ दिवस लागतात . पुढे हा कालावधी कमी होतो . शेवटच्या ४ ते ५ दिवसात खाद्य मिश्रणावरील आच्छादन बाजूला काढून पाणी टाकणे बंद करावे . जसजसे गांडूळ खत कोरडे होत जाईल तसतसे गांडूळ गादी वाफ्यात शिरतील . त्यानंतर कोरडे खत गोळा करून ते रेती गाळण्याच्या चाळणीने ( २.५ मि.मी. ) गाळून घ्यावे . चाळणीवर जे गांडूळ जमा होतील त्यांचा पुन्हा खत निर्मितीसाठी वापर करावा . गांडूळ खताचा विविध पिकांसाठी जोरखत म्हणून उपयोग करावा 

Leave a Comment