जुलै महीन्यात करावयाची शेतीची कामे

जुलै महीन्यात करावयाची शेतीची कामे

जुलै महीन्यात करावयाची शेतीची कामे
 जुलै महीन्यात करावयाची शेतीची कामे

जुलै महिन्याच्या सुरवातीस खरीप पिकांची राहिलेली पेरणी लवकरात लवकर आटोपावी . मागील महिन्यात पेरणी केलेल्या खरीप पिकांची वेळेवर विरळणी , निंदणी व डवरणी करण्यासोबतच एकीकृत कीड व्यवस्थापन करावे . शेतकरी बंधुंनी या महिन्यात खालील कामे वेळेवर व अचूक करण्यावर भर द्यावा .

खरीप पिकांची राहिलेली पेरणी समतल रेषेला समांतर किंवा मुख्य उताराला आडवी करावी . ७ जुलैनंतर कपाशी , ज्वारी , मूग , उडीद या पिकांऐवजी सोयाबीन , तूर , सूर्यफूल , मका , बाजरी , एरंडी या पिकांची पेरणी करावी . १५ जुलै नंतर सोयाबीन पीक घेऊ नये .

पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ति घरचे घरी तपासावी व त्यानुसार एकरी बियाण्याचे प्रमाण ठरवावे . पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम + पीएसबी २५ ग्रॅम + जिवाणूसंवर्धन २५ ग्रॅम ( कपाशी व ज्वारी यांना अॅझेटोबॅक्टर व सोयाबीनचे बियाण्यास रायझोबियम जपोनिकम ) प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करून , बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी .

खरीप पिके रोपावस्थेत असताना पावसात खंड पडल्यास डवरणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी .

सलग पिकांऐवजी सोयाबीन + तूर २ : १ किंवा ४ : २ ओळी या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा .

धानबांधीत चिखलणी करताना हेक्टरी ५० किलो प्रत्येकी नत्र , स्फूरद व पालाश द्यावे . ( हेक्टरी युरिया ब्रिकेटस् ७० किलो – डीएपी ब्रिकेटस् १०० किलो द्यावे )

गादीवाफ्यावर ( नर्सरीत ) तयार केलेली धानाची २१ ते २५ दिवसांची रोपे २०x१५ सें.मी. अंतरावर प्रत्येक चुडात २ ते ३ रोपे लावावीत .

धान लावणीनंतर रोपांची मुळे चांगली रूजेपर्यंत बांधीत पाण्याची एक इंच पातळी ठेवावी

पावसाचे पाणी जागेवरच ( मुलस्थानी ) मुरविले तर मातीची धूप कमी होते तसेच पावसाचे पाण्याचे निचऱ्याकरिता खरीप पिकांच्या पेरणीनंतर ३० दिवसांनी डवऱ्याच्या जानकुळास नारळी दोरी बांधून दर दोन ओळीनंतर सरी काढावी . जादा पाणी शेताच्या उताराचे शेवटी शेततळ्यात गोळा करावे .

आंब्याच्या केशर , दशहरी , आम्रपाली , पायरी , लंगडा जातीच्या तयार कलमांची ८४८ किंवा १०x१० मीटर अंतरावर १x१४१ मीटरचे आकाराचे खड्डे करून लागवड करावी .

बसराई केळीची ५४५ फूट लागवड करावी . तलवारीच्या पात्याप्रमाणे पाने असलेले २ ते ३ महिन्याचे निरोगी मुनवे निवडावेत .

बागायती फळपिके – संत्रा , मोसंबी , लिंबू , चिकू तसेच कोरडवाहू फळपिके – पेरू , सीताफळ , चिंच , जांभूळ , आवळा यांची लागवड करावी .

गॅलार्डिया , झेंडू , शेवंती , मोगरा , ग्लॅडिओलस या फुलझाडांची लागवड करावी .

मिरची , टोमॅटो , वांगी , फुलकोबी या खरीप भाजीपाला पिकांची ४ ते ६ आठवडे वयाच्या रोपांची लागवड करावी .

योग्य बाजारपेठ शोधून व खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी कायदेशीर करार करून सदाफुली , सर्पगंधा , रानवांगी , कस्तुरी भेंडी , कोरफड , गवती चहा , तिखाडी , खस , सफेद मुसळी या औषधी व सुगंधी वनस्पतींची मर्यादित क्षेत्रात लागवड करावी .

साग , बांबू , शिवण , जट्रोफा , सिमारूबा तसेच बिब्बा , हिरडा , बेहडा , चारोळी , बेल , शिकेकाई , रिठा , कढीपत्ता , शेवगा इत्यादीची बियाणे – रोपे उपलब्धता व योग्य बाजारपेठ यांचा विचार करून लागवड करावी .1 thought on “जुलै महीन्यात करावयाची शेतीची कामे”

Leave a Comment