धान ( भात ) लागवड तंत्र

 धान ( भात ) लागवड तंत्र : 

धान ( भात ) लागवड तंत्र
धान ( भात ) लागवड तंत्र 

धान हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात आणि पाण्याची हमखास सोय असेल तर उन्हाळी हंगामात घेता येते . 

हंगाम : 

उच्च तापमान आणि आर्द्रता या पिकास पोषक असते . पुरेसा पाऊस व सिंचन सोय उपलब्ध असल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते . 

पूर्वमशागत व भरखते : 

हंगाम अखेर कापणी झाल्यावर जमीन नांगरून शेतातील सर्व धसकटे , गवत , झुडुपे कापून जाळून टाकावीत . पावसाळा सुरु झाल्यावर शेतात पाणी साचले असताना उभी व आडवी नागरणी करावी . पूर्व मशागतीनंतर हेक्टरी २५ ते ३० गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावे किंवा धैचा / बोरु सारखे हिरवळीचे पीक घेऊन चिखलणीच्या वेळी गाडावे . 

पेरणी : जमीन नांगरून , ढेकळे फोडून भुसभुसीत करावी आणि १०० सें.मी. रुंद व १० सें.मी. उंच असे योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावे . या गादीवाफ्यावर दर आर क्षेत्राला ३०० किलो चांगले कुजलेले शेणखत , १ किलो युरिया किंवा २ किलो अमोनियम सल्फेट जमिनीत टाकून मिसळावे . पेरणीसाठी बारीक जातीकरीता ३५ ते ४० किलो आणि मध्यम व ठोकळ जातीकरिता ५० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे . सह्याद्री या संकरीत वाणाचे हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे . पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी . बीज प्रक्रियेसाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ ( ३ टक्के ) या प्रमाणात द्रावण करून त्यात बी ओतावे . द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बी चाळणीने काढून जाळून टाकावे . तळातील निरोगी बी २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत २४ तास वाळवावे . पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ( ३ ग्रॅम / किलो ) बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी . पावसाळा सुरु होताच गादी वाफ्यावर ७ ते ८ सें.मी. अंतरावर ओळीत १ ते २ सें.मी. खोल बी पेरून मातीने झाकावे . पेरणीनंतर १५ दिवसांनी दर आर क्षेत्राला १ किलो युरिया द्यावा . २० ते २५ दिवसांत रोपे लावणीकरिता तयार होतात .

 चिखलणी : पूर्व मशागत केलेल्या धानाच्या शेतात लाकडी नांगर , पॉवर टिलर अथवा ट्रॅक्टरने चिखलणी करावी . चिखलणीनंतर शेत समपातळीत येण्यासाठी पाटी ( फळी ) फिरवावी . चिखलणी करतांना स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खताची शिफारस केलेली पूर्ण मात्रा व नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा शेतात मिसळावी . शेतात पाणी बांधून ठेवावे ,

रोवणी : लावणीसाठी रोप काढण्याच्या दोन दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढवावी . त्यामुळे मुळे न तुटता रोप काढण्यास मदत होते . रोपांची लावणी २० से.मी. १५ सें.मी. अंतरावर प्रत्येक चुडात २ ते ३ रोपे सरळ व उथळ म्हणजेच २ ते ४ सें.मी. खोलवर लावावीत . सह्याद्री या संकरीत धानाची रोवणी २०x२० सें.मी. अंतरावर करावी व प्रत्येक चुडात एक रोप लावावे . 

रासायनिक खते : जमिनीची तपासणी करून योग्य प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्यास शेती किफायतशीर होते . सर्वसाधारणपणे १०० किलो नत्र , ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे . संपूर्ण स्फुरद व पालाश आणि नत्राची १/२ मात्रा चिखलणीच्या वेळेस तर उरलेली नत्राची अर्धी मात्रा दोन समान हप्त्यात ( फुटवे फुटण्याच्या वेळी आणि लोंबी येण्याच्या सुरुवातीस ) विभागून द्यावी . पेरीव व कोरडवाहू धानाकरिता ६० किलो नत्र , ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे . सह्याद्री या संकरीत वाणास रासायनिक खताची शिफारशीत मात्रा २५ टक्क्यांनी वाढवून द्यावी . 

पाणी व्यवस्थापन : धान लावणीनंतर रोपांची मुळे चांगली रुजेपर्यंत बांधीत पाण्याची पातळी २.५ सें.मी. ( एक इंच ) ठेवावी . यानंतर दाणा पक्व होईपर्यंत ही पातळी साधारणतः ५ सें.मी. ( दोन इंच ) पर्यंत वाढवावी . अधूनमधून पाण्याचा निचरा करावा . पीक निसवण्यापूर्वी १० दिवस व पीक निसवल्यानंतर १० दिवस पाण्याची पातळी १० सें.मी. ( चार इंच ) ठेवावी . त्यानंतर हळूहळू पाण्याची पातळी कमी करावी व कापणीपूर्वी १० दिवस अगोदर बांधीतील पाणी पूर्णपणे काढून टाकावे . 

आंतरमशागत : आंतरमशागतीची कामे पीक निसवण्यापूर्वी एक महिन्याअगोदर संपवावी . तणांचा नायनाट करण्यासाठी धान रोवणीनंतर ५-६ दिवसांनी ४ लिटर बुटाक्लोर + ५०० लिटर पाणी प्रती हेक्टरी या प्रमाणात वापरावे किंवा लावणीनंतर सुमारे १५ दिवसांनी कोळपणी व निंदणी करून त्यानंतर २-३ आठवड्यांनी पुन्हा एक कोळपणी व निंदणी करून पीक तणविरहीत ठेवावे . 

कापणी व मळणी : पीक निसवल्यानंतर साधारणपणे २५ ते ३० दिवसांनी लोंबीतील ९ ० टक्के दाणे पक्व झाल्यावर धानाची कापणी करावी आणि पीक पूर्णपणे वाळल्यानंतर मळणी करावी .

Leave a Comment