नवजात वासरांना होणारे रोग व त्यांचा प्रतिबंध

 नवजात वासरांना होणारे रोग व त्यांचा प्रतिबंध 

नवजात वासरांना होणारे रोग व त्यांचा प्रतिबंध
नवजात वासरांना होणारे रोग व त्यांचा प्रतिबंध 

नवजात वासरांतील मृत्युचे प्रमाण लक्षात घेता ते होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे . गाभण काळात मातेचे अयोग्य संगोपन व जन्मल्यानंतर नवजात वासराला पुरेशा प्रमाणात चीक न मिळणे ही नवजात वासरांतील मृत्युची ठळक कारणे आहेत . गाभण काळात विशेषतः शेवटचे तीन महिने गाई , म्हशीना पोष्टिक खुराक व भरपूर चारा दिल्यास सशक्त वासरे जन्माला येतात . चिकाचे व दुधाचे प्रमाणही अधिक असते . त्यामुळे वासरे पुढील काळात निरोगी राहतात . जन्मल्यानंतरचा एक महिन्याचा काळ हा वासराच्या दृष्टीने अधिक काळजीचा असतो . गाभण काळात विण्याच्या अगोदर दोन महिने गाई , म्हशीना ‘ लेव्हॉमिसाल ‘ नावाचे औषध टोचल्यास चिकामधील रोग प्रतिकारक पेशीचे प्रमाण वाढते . प्रत्येक गाभण जनावराला पशुवैद्यकाकडून हे औषध टोचून घ्यावे . वासरू जन्मल्यानंतर जितक्या लवकर शक्य असेल त्याप्रमाणे पहिल्या १-२ तासातच त्याला पुरेसा चीक पाजावा . प्रती किलोग्रॅम वजनामागे ५० मि.ली. असे चीक पाजण्याचे प्रमाण असावे . 

नवजात वासरांना होणारे सर्वसाधारण रोग : 

नाळसूज : वासरू जन्मल्यानंतर नाळेची काळजी न घेतल्यास नाळेच्या जागी सूज येऊन तेथे पू साठतो . हे गळू नंतर फुटले तरी नाळसूजेने ग्रस्त वासरू सतत आजारी राहते व त्याच्या शरीराची योग्य वाढ होत नाही . तुटलेली नाळ दोऱ्याने घट्ट बांधून त्यावर टिंक्चर आयोडीन व इतर जंतुनाशक लावावे . त्यामुळे तेथे रोगजंतू वाढणार नाहीत .

 पांढरी हगवण : चिकावाटे पुरेशा प्रमाणात रोग प्रतिकारक शक्ती न मिळाल्यास हा रोग होतो . अतिसाराने जलशुष्कता येऊन वासरे मृत्युमुखी पडतात . हा रोग झाल्यास प्रभावी प्रतिजैवके वापरावी . पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषध व सलाईन सारखे द्रव पदार्थ द्यावेत . 

रक्त हगवण : हा रोग एकपेशीय जंतुमुळे होतो . वेळीच उपचार न झाल्यास वासरे रक्तस्त्राव व जलशुष्कता यामुळे मरण पावतात . सल्फा गोळ्या हे प्रभावी औषध आहे . मात्र सलाईन पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार द्यावे . 

दुधाळ जनावरांना होणारे रोग आणि त्यांचा प्रतिबंध 

दूध देण्याच्या प्रक्रियेमध्ये जनावराच्या शरीरातील शर्करा , कॅल्शियम , मॅग्नेशियम , फॉस्फरस इत्यादी पदार्थ शरीराबाहेर जात असल्याने दूध देणाऱ्या जनावरावर सतत मोठा ताण पडतो . दुधावाटे पडणाऱ्या पदार्थांची पुर्तता खाद्यान्नातून केली नाही तर जनावरात या घटकांच्या कमतरतेचे रोग निर्माण होतात तसेच कमतरतेमुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावरांना संसर्गजन्य रोग होतात . दुधाळ जनावरांची दूध देण्याची क्षमता कायम राखण्यासाठी या रोगाचा प्रतिबंध करणे आवश्यक आहे . 

स्तनदाह : हा रोग सुप्त वा स्पष्ट अवस्थेत आखळतो . सुप्त स्तनदाहामध्ये कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नसली तरी दुग्धोत्पादन सातत्याने कमी होत जाते . दुधाळ जनावराच्या दुधाची तपासणी करून हा रोग झाला किंवा नाही याची खात्री करावी . ‘ मॅस्ट्रीप ‘ नावाचे तपासणी कागद औषधाचे दुकानात मिळतात . या कागदावर दुधाचे थेंब टाकल्यास होणाऱ्या रंग बदलामुळे स्तनदाह ओळखता येतो . सुप्तावस्थेतील स्तनदाह आढळल्यास त्वरीत पशुवैद्यकाची मदत घ्यावी . स्पष्ट स्तनदाह कांसेतील व दुधातील बदलामुळे सहज ओळखता येतो . कांस सुजाणो , गरम होणे व स्पर्श केला असता दुखणे ही प्रमुख लक्षणे होत . दूध पाण्याप्रमाणे पातळ व दह्याप्रमाणे घट्ट किंवा रक्त मिश्रित असते . या रोगासाठी पशुवैद्यकाची मदत आवश्यक आहे . दुधाळ जनावरांना हा रोग होऊ नये म्हणून कासेची स्वच्छता व कांसेवर जखमा होऊ नयेत म्हणून गोठ्याची स्वच्छता व गायोच्या कासेची काळजी घेणे आवश्यक आहे . जनावर दूध देणे बंद करण्याच्या वेळी शेवटच्या दिवशी दूध काढल्यानंतर प्रत्येक आचळामध्ये प्रतिजैवक मलम भरून दिल्यास पुढील दुग्धोत्पादन काळात स्तनदाह होत नाही . 

दुग्धज्वर : व्याल्यानंतर २४ ते ४८ तासात जनावरात हा रोग होण्याची शक्यता असते . गर्भात वासरू वाढत असताना त्याच्या शरीरवाढीसाठी व व्याल्यानंतर चिकावाटे जनावराच्या शरीरातील कल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने हा रोग होतो . सुस्त होणे , थरथर कापणे , बाह्यांग बंडगार होणे व ग्लानी येणे ही या रोगाची लक्षणे आहेत . शरीरातील कॅल्शियमचा पुरवठा पूर्ववत झाल्यावर जनावर बरे होते . रोगाची लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकाची मदत घेणे आवश्यक आहे . गाभा काळात व व्याल्यानंतर कॅल्शियमयुक्त क्षार मिश्रणे / खनिज मिश्रणे भरपूर प्रमाणात दिल्यास हा रोग होत नाही . 

किटोसीस : दूध देणाऱ्या जनावराच्या शरीरातील शर्कराचे ( ग्लुकोज ) प्रमाण कमी झाल्यास हा रोग होतो . व्याल्यानंतर ६ ते ८ आठवड्यानंतर म्हणजे ज्यावेळी दूध देण्याचे प्रमाण सर्वोच्च असते त्या काळात हा रोग होतो . खुराक खाणे बंद करणे व एकदम अशक्तपणा येणे , अंगावर धावून येणे अशी लक्षणे या रोगात दिसतात . गाभण काळात व व्याल्यानंतर मका व गव्हाचा कोंडा याचे मिश्रण दिल्यास शर्करेचे प्रमाण योग्य राहून हा रोग होत नाही . रोग झाल्यास तत्काळ पशुवैद्यकाची मदत घ्यावी . 

जनावरांना होणारे परजीवी रोग व त्यावर प्रतिबंधक उपाय 

१. कृमी रोग : जनावरांना अनेक प्रकारचे कमी रोग होतात . कृमीमध्ये मुख्यत्वे गोलकमी , चापटकृमी व पर्णकृमी म्हणून ओळखले जातात . गोल व चापट कृमी गुरांच्या आतड्यात तर पर्णकृमी यकृतात व पोटात आढळतात . गोलकृमी रोगाचा शिरकाव दूषित खाद्य व पाणी तर चापकृमींचा फैलाव दूषित खाद्य तसेच तलावात असणाऱ्या गोगलगाई व गवतावर असणाऱ्या किटकामार्फत होतो . कृमी रोगाने पछाडलेले जनावर सुस्त व अस्वस्थ दिसते , भूक मंदावते , शेण अति घट्ट किंवा पातळ होते , शेणाला विशिष्ट वास येतो . कृमी रोगामुळे दूध देण्याचे प्रमाण कमी होते . शेतात काम करणाऱ्या बैलाची शक्ती मंदावते . या रोगाचे निदान शेण तपासून केले जाते . रोगी जनावरे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तपासून औषधोपचार करावा . गुरांना स्वच्छ पाणी व ताजे खाद्य द्यावे . गुरांच्या राहण्याची जागा नियमित स्वच्छ ठेवावी . 

२. किटक रोग : हा रोग गोचीड , चावणाऱ्या माशा व इतर किटक इत्यादी पासून होतो . काही किटक गुरांच्या कातडीवर सतत राहून , तर काही किटक अधूनमधून गुरांवर आक्रमण करून आपली उपजीविका पूर्ण करतात . हे किटक गुरांच्या कातडीला चावा घेतात , रक्त पितात व गुरांना अस्वस्थ करतात . या किटकांचा नायनाट करण्याकरिता पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा .

३. रक्तातील परजीवी जीवाणू रोग 

अ ) थायलेरियासिस : हा रोग गोचीड चावण्यामुळे होतो . या रोगात गुराला सतत ताप येतो , जनावर अशक्त होते , खांद्याच्या व मागील पायाच्या बाजूला असणाऱ्या गाठी सुजतात . हा रोग साधारणतः वासरांना जास्त प्रमाणात होतो . गुरे एक ते दीड आठवड्यात दगावतात . या रोगावर वेळीच पशुवैद्यकाकडून निदान करून उपचार केल्यास जनावर जिवंत राहते . 

ब ) बॅबेसिओसिस : हा रोगसुद्धा गोचिडामार्फत होतो . गुरांना खूप ताप येतो , लघवी कॉफी रंगाची दिसते , अशक्तपणा येतो . या रोगावर उपलब्ध असलेल्या औषधाचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावा . 

क ) ट्रिपॅनोखिमियासिस : हा रोग चावणाऱ्या माशांद्वारे होतो . गुरांना ताप येतो , ते कावरे बावरे दिसतात , गोल गोल फिरतात व चक्कर आल्यासारखे पडतात . डोळे लाल दिसतात . या रोगाच्या तीव्र दशेत जनावर दगावण्याची भीती असते , दुधाळू जनावरात दूध देण्याची क्षमता कमी होते . पशुवैद्यकाच्या सल्ल्याने या रोगाचा उपचार करावा . गुरांवर चावणाऱ्या माशा दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी . 

४. परजीवी रोगावर झालेल्या संशोधनाबाबत माहिती व शिफारस 

अ ) पूर्व विदर्भातील जनावरांमध्ये कृमी रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात होतो . ही बाब लक्षात घेता या रोगाचे निर्मूलन जून व सप्टेंबर महिन्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कृमीनाशक औषध करून घेणे हितावह आहे . 

ब ) नागपूर परिसरातील कोंबड्यामध्ये कृमी रोगाचा फैलाव लक्षात घेता याचे निर्मूलन जून व ऑक्टोबर महिन्यात करावे . पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषध उपचार करावा . 

जनावरांतील सामान्य विषबाधा 

विदर्भ विभागातील जनावरामध्ये प्रामुख्याने खालील प्रकारच्या विषबाधा आढळून येतात . या विषबाधा टाळता येणे शक्य आहे . मात्र त्यासाठी पर्याप्त माहिती असणे आवश्यक आहे . 

१. सायनाईडची विषबाधा : संकरीत ज्वारीचे नवीन थोब किंवा ज्वारी कापल्यानंतर येणारे फुटवे यामध्ये हायड्रोसायनिक आम्ल या विषारी द्रव्याचे प्रमाण अधिक असते . हिवराच्या शेंगामध्येही हे आम्ल असते . हे आम्ल जनावराच्या पोटात गेल्यास थोड्याच अवधीत जनावरे अस्वस्थ होतात व त्यांना श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होतो , डोळे विस्फारून व फेफरे येऊन जनावरे मरण पावतात . डोळे शेंदरी रंगासारखे होणे हे या विषबाधेचे ओळखता येण्यासारखे लक्षण आहे . पशुवैद्यकिय अधिकाऱ्याची तात्काळ मदत घेतल्यास जनावरे वाचू शकतात . ज्वारीचे फुटवे असलेल्या शेतात जनावरांना चरण्यास सोडू नये . 

२. आक्ॉलिक आम्लाची विषबाधा : काळी बुरशीयुक्त कडबा जनावराच्या खाण्यात आल्यास किंवा रबी गहू – हरभरा पिकात वाढणारे ‘ ढोरकाकडा ‘ नावाचे तण जनावरानी खाल्ल्यास त्यांना विषबाधा होते . या विषबाधेमुळे रक्तात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते . त्यामुळे अडखळत चालणे , कुंथणे , पोटफुगी , लघवी थेंबाथेंबाने होणे किंवा अजिबात न होणे अशी लक्षणे दिसतात . गुद्द्वारापासून ते मागील दोन पायातून अंडकोषापर्यंत सूज आलेली आढळते , कॅल्शियमचे इंजेक्शन पशुवैद्यका मार्फत दिल्यास विषबाधेचे प्रमाण उतरते . एक किलो कळीचा चुना १० लिटर पाण्यात काही वेळ ठेवून तयार झालेली चुन्याची निवळी ( १ लिटर दर आठ तासानी ) पाजल्यास ही विषबाधा कमी होते . बुरशीयुक्त कडया अथवा गहू – हरभऱ्यातील उपटून टाकलेले तण जनावरांना खाण्यास देऊ नये . 

३. सरकीतून होणारी विषबाधा : दूध देणाऱ्या जनावरांना अगर बैलांना सरकी खाजा घालण्यात येते . किटक प्रतिबंधक व अधिक उत्पादन देणाऱ्या कपाशीच्या सरकीमध्ये गाँसीपॉल या विषारी द्रव्याचे प्रमाण अधिक असते . गॉसीपॉलयुक्त सरकी जनावराच्या सतत खाण्यात आल्यास दीर्घकालीन विषबाधा होण्याची शक्यता गृहीत धरून सरकी सतत खाना घालू नये , चार आठवडे सतत खाद्य दिल्यास नंतर एखादा आठवडा देऊ नय .

gripe water ke fayde

Leave a Comment