मका लागवड तंत्र

 मका लागवड तंत्र 

मका लागवड तंत्र
मका लागवड तंत्र 


जगात तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू व भात या पिकानंतर मक्याचा क्रमांक लागतो . निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होण्याची क्षमता असलेले मका हे एकमेव पीक आहे . अन्नधान्याव्यतिरिक्त मक्याचा विविध कारणासाठी उपयोग होतो . 

मका लागवड तंत्र 

हगाम : 

मका हे उष्ण हवामानाला उत्तम प्रतिसाद देणारे पीक असले तरी या पिकाची लागवड खरीप , रबी व उन्हाळी या तिनही हंगामात करता येते . खरीपात भरपूर उत्पन्नाच्या दृष्टीने या पिकाकरिता साधारणतः ६० सें.मी. पावसाची आवश्यकता भासते . परंतु यापेक्षा जास्त पावसात किंवा अनिश्चित परिस्थितीतसुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे घेता येते .

 जमीन : 

पाण्याचा योग्य निचरा होणारी , भारी ते मध्यम प्रतीची जमीन उपयुक्त असली तरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये मक्याची लागवड करता येते . जमिनीचा सामू ( पी.एच. ) ६.५ ते ७.०० असावा . पाणबसन किंवा चिबड जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू नये . 

पूर्वमशागत : खरीप हंगामाकरिता उन्हाळ्यामध्ये मान्सूनपूर्व एक नांगरणी करून वखराच्या ३-४ पाळ्या द्याव्यात आणि जमीन भुसभुशीत करावी . 

भरखते : वखराच्या शेवटच्या पाळीपूर्वी शेतात हेक्टरी १५ ते २० गाड्या शेणखत अथवा कम्पोस्ट खत पसरवून द्यावे . 

रासायनिक खते : या पिकास एकूण हेक्टरी १२० किलो नत्र , ६० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे . यापैकी ४० किलो नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीचे वेळी द्यावे . उरलेल्या नत्रापैकी हेक्टरी ४० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी व राहिलेले ४० किलो नत्र पेरणीनंतर ५० दिवसांनी द्यावे . : 

पेरणी : मक्याची पेरणी खरीप हंगामात २० जून ते ७ जुलैच्या दरम्यान ६० सें.मी. अंतराच्या तिफणीने करावी व दोन ताटातील ( रोपातील ) अंतर विरळणीनंतर १५ ते २० सें.मी. राहील याची काळजी घ्यावी . हेक्टरी झाडांची संख्या ८० हजार ते एक लक्ष अपेक्षित आहे .

बियाण्याचे प्रमाण व बीज प्रक्रिया : पेरणीकरिता हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे . बियाण्यास थायरम हे बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात घेऊन बीज प्रक्रिया करावी . 
आंतरमशागत : पीक ४० दिवसांचे होईपर्यंत या पिकास २ ते ३ डवरण्या व निंदण करून शेत तणविरहीत ठेवावे . मक्यातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी शिफारशीत तणनाशकाचा वापर करण्यास हरकत नाही . याकरिता अॅट्राझीन हे तणनाशक ०.५ ते १ किलो क्रियाशील घटक , ७०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी उगवणपूर्वी जमिनीवर फवारावे . 
ओलीत व्यवस्थापन : खरीप हंगामात पाण्याचा ताण पडल्यास एक किंवा दोन संरक्षक ओलिताच्या पाळ्या द्याव्या . पिकाच्या वाढीच्या काळात ( विशेषतः पिकास तुरा येण्याचा काळ , कणसे उगवण्याचा काळ व दाण्याची दुधाळ अवस्था ह्या नाजूक अवस्थांमध्ये ) पाण्याची जास्त आवश्यकता असते . अशावेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पन्नात बरीच घट येते . म्हणून नाजूक अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये . ह्याबरोबरच जमिनीमधे ३ ते ४ दिवस पाणी साचून राहिल्यास सुद्धा उत्पन्नात ५० टक्क्यापर्यंत घट येते . 

मक्यावरील किडी व रोगांचे व्यवस्थापन : 

किडी 

१ ) मावा व तुडतुडे : ह्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ६ मि.ली. किंवा एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही १४ मि.ली. , १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे अथवा एन्डोसल्फान ४ टक्के किंवा क्विनालफॉस १.५ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी . आवश्यकता भासल्यास १०-१५ दिवसानंतर पुन्हा दुसरी फवारणी / धुरळणी करावी . 
२ ) खोडकिडा : पीक सुमारे ३० दिवसाचे झाल्यानंतर प्रादुर्भाव दिसून येताच ४ टक्के दाणेदार एन्डोसल्फान किंवा ३ टक्के दाणेदार कॉर्बोफ्युरान हेक्टरी १० किलो याप्रमाणे झाडाच्या पोंग्यात टाकावे . आवश्यकता भासल्यास एन्डोसल्फॉन ३५ टक्के प्रवाही १४ मि.ली. १० 39 : लिटर पाण्यात मिसळून फवारावे . 
३ ) लष्करी अळी  : या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच मिथाईल पॅराथिऑन २ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो याप्रमाणे धुरळावी किंवा कार्बारील ५० टक्के पा.मि. भुकटी ४० ग्रॅम , १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी . 
४ ) कणसातील अळी : या किडीचा बंदोबस्त करण्याकरिता कणसातून ( स्त्री केसाग्रातून ) दोरे बाहेर दिसताच एक किंवा दोन वेळा कार्बारील १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात ( फक्त कणसावर ) धुरळावी . 
रोग : मक्यावर रोपमर , गाभासड , धांडासड , चारकोल रॉट ( खडखड्या ) , पानावरील ठिपके , काजळी , तांबेरा , केवडा हे रोग आढळून येतात . त्यांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण पाहून शिफारशीप्रमाणे उपाय योजना करावी . 

काढणी व मळणी : कणसे पिवळसर व दाणे कडक झाल्यावर कणसे खुडून काढावीत व २ ते ३ दिवस उन्हात चांगली वाळवावीत . कणसातील ओलाव्याचे प्रमाण २० टक्क्याचेवर नसावे . त्यानंतर मळणी यंत्राच्या सहाय्याने कणसातील दाणे वेगळे करावे .

Leave a Comment