शेळी व मेंढी च्या जाती आणि त्यांची वैशिष्टे

 शेळी व मेंढीच्या जाती आणि त्यांची वैशिष्टे 

शेळी व मेंढी च्या जाती आणि त्यांची वैशिष्टे
शेळी व मेंढी च्या जाती आणि त्यांची वैशिष्टे 

शेळी ( बकरी ) : 

१ ) जमनापारी : ही जात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील गंगा , यमुना आणि चंबळ नद्यांच्या खोऱ्यात आढळून येते . उत्तम दूध व मासांसाठी ही जात प्रसिद्ध आहे . या जातीच्या शेळ्या दणकट , चपळ , देखण्या , उंच व रंगाने पांढऱ्या , पिवळसर असतात . या जातीच्या नराचे वजन ६० ते ९ ० किलो व मादीचे वजन ५० ते ६० किलो असते . एका वेतात ( ३०५ दिवसात ) शेळी ६०० लिटर दूध देते . या जातीमध्ये एकावेळी दोन करडे ( पिल्ले ) देण्याचे प्रमाण ३३ टक्के आहे . 

२ ) बारबरी : ही जात उत्तर प्रदेशातील इटावा , आग्रा , मथुरा , अलीगढ या भागात आढळून येते . ही जात दुधाळ म्हणून प्रसिद्ध आहे . नराचे वजन ४० ते ५० किलो व मादीचे वजन ३५ ते ४० किलो असते . रंग पांढरा असून अंगावर काळे ठिपके असतात . पाय आखूड असल्याने त्या बुटक्या दिसतात . शेळ्या १५ महिन्यात दोन वेत देतात . या शेळ्या दोन किंवा तीन करडांना ( पिल्लांना ) जन्म देतात . ह्या शेळ्या सरासरी दररोज १.५ ते २ लिटर दूध देतात . एका वेतात साधारणपणे २५० ते ३०० लिटर दूध मिळते . 

३ ) ब्लॅक बेंगाल : या जातीच्या शेळ्या प . बंगालमध्ये आढळतात . यांचे मांस अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असते . कातडी मऊ असल्याने भारतात आणि परदेशामध्ये तिला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे . ही जात एका वेतात दोन किंवा तीन पिल्लांना जन्म देते . शेळ्या रंगाने काळ्या आणि तांबड्या असतात . शेळ्यांचे सरासरी वजन १५ किलो असते . 

४ ) सिरोही ( अजमेरी ) : ही जात प्रामुख्याने राजस्थान व आजुबाजूच्या भागात आढळून येते . ही जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे . या जातीच्या शेळ्या बांध्याने मजबूत असून मध्यम आकाराच्या असतात . रंग फिक्कट तपकिरी असून त्यावर गडद तपकिरी रंगाचे मोठे ठिपके असतात . शिंगे मध्यम असून मागे वळलेली असतात . नराचे वजन ५० किलो तर मादीचे वजन २५ किलो असते . 

५ ) उस्मानाबादी : या जातीच्या शेळ्या महाराष्ट्रात उस्मानाबाद भागात आढळतात . या आकाराने मोठ्या असून मांसासाठी प्रसिद्ध आहेत . यांचा रंग काळा असून शिंगे मोठी असतात . या जातीत बरेचदा पांढरा किंवा तांबडा रंग सुद्धा आढळतो . 

मेंढी : 

१ ) नेल्लोर : या मेंढ्या आंध्रप्रदेशात आढळतात . त्यांच्या अंगावर लोकर फार कमी असते . सरासरी वजन ४० किलो असते . मेढ्या पांढऱ्या व काही तांबूस रंगाच्या असतात . त्याचा बांधा शेळीप्रमाणे , पाय व मान लांब , शेपूट आखूड असते . मांसाकरिता उपयुक्त , 

२ ) डेक्कनी : ही मेंढी महाराष्ट्रात व त्याला लागूनच आंध्र व कर्नाटकचा भाग या ठिकाणी आढळते . रंग पांढरा , काळा किंवा इतर रंगात आढळते . आकाराने लहान , शेपूट आखूड , लोकर केसाळ असते . वार्षिक लोकर उत्पादन ०.३ ते ०.४ किलो मिळते . 

३ ) बिकानेरी , चोकला : या जातीच्या मेंढ्या राजस्थानात आढळतात . यांचा रंग पांढरा असून तोंड काळे किंवा तांबडे असते . लोकर उत्पादन १ ते १.५ किलो वर्षाला मिळते . 

४ ) मालपुरा : या राजस्थानात आढळतात . या मेंढ्याचा रंग पांढरा असतो . लोकर उत्पादन वर्षाला ८०० ग्रॅम असते . मांसाकरिता ( मटनाकरिता ) व लोकरीकरिता उपयुक्त . 

शेळी व मेंढी पालन 

१. वहितीखाली नसलेल्या नापीक जमिनीवर एक एकर क्षेत्रामध्ये ८ ते १० शेळ्या किंवा मेंढ्या पाळता येतात . दिवसातून ८ तास चरण्यास सोडावे . २०० मेंढ्या अथवा १०० बकऱ्या चारण्यास २ माणसे लागतात . 

२. फक्त पावसाळ्यात चांगल्या निवाऱ्याची गरज आहे . प्रत्येकी ८ चौरस फूट जागा लागते . पिण्याच्या पाण्याचा हौद अथवा टब , अलपाकरिता लांब गव्हाण व चाऱ्याकरिता सोय करावी . 

३. नर , माद्या व करडे ( पिल्ले ) यांचे वेगळे कळप असावेत . चराईत शेताला कुंपण केले तर व्यवस्था नीट करता येते . 

४. लहान पिल्लांना तीन महिने आईचे दूध पाजावे . दोन महिने वयात एन्टेरोटॉक्सेमिया रोगाची लस टोचावी . 

५. इतर जनावरांना सुद्धा टीसीआरपी , बुळकांडी , एन्टेरोटॉक्सेमिया , तोड खुरी , पाय खुरी , सीसीपीपी या रोगांच्या लसी पशू वैद्यकीय सल्ल्याने ठराविक वेळी टोचाव्या . गर्भारकाळात लस टोचू नये . 

६. पॉनाकूर , बॅनामिन्थ , थायबेंडाझॉल किंवा फिनोथायाझीन अथवा तत्सम कृमीनाशक औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वापरावीत . 

७. महिन्यातून एकवेळा शेळ्या – मेंढ्यांना धुवावे . गॅमेक्झीन पावडरची धुरळणी ( डस्टींग ) करावी . 

८. मेंढ्या सुबाभूळ , शेवरी , कांचन , हेटा , रावणवाल आणि बोर हा चारा आवडीने खातात . ह्या चारा वनस्पती चवदार असून त्यांची आहारशास्त्रदृष्टया पोषणमूल्ये सुद्धा उत्तम आहेत . 

९ . प्रत्येक जनावरास चार ते पाच किलो हिरवा चारा व २५० ग्रॅम खाद्यान्न द्यावे . यासाठी खालीलप्रमाणे मिश्रण करून अलप घरी तयार करता येईल . 

                      खाद्यान्न                                                               मिश्रणाचे प्रमाण 

भुईमुगाची ढेप                                                                      २५ भाग 

गव्हाचा कोंडा                                                                        ३३ भाग 

मका , बाजरी , ज्वारी भरडलेली                                              ४० भाग 

खनिज पदार्थ मिश्रण                                                               १ भाग 

मीठ                                                                                       १ भाग      

 दुभत्या शेळी अथवा मेंढीस ३५० ते ४०० ग्रॅम व नरास ४०० ग्रॅम खाद्यान्न द्यावे . 

१०. मेंढ्या व शेळ्यांचे नर ९ महिने वयाचे झाले म्हणजे मांसाकरिता विक्रीस काढावेत . 

११. गिरीपुष्पाचा पाला मेंढ्यांसाठी एक उत्तम पोषणमूल्ये असलेला चारा आहे . नुसत्या पाल्यावर सुद्धा मेंढ्यांची दररोज ४२ ग्रॅम्स पर्यंत वजनवाढ होऊ शकते . 

१२. टाकळच्या पाल्यात पोषणमूल्ये उत्तम असल्यामुळे शेळ्यांना टाकळच्या कोवळ्या फांद्या व पाने खाऊ घालावीत . 

१३. आपट्याचा पाला बकऱ्यांसाठी उत्तम पोषणमूल्ये असलेला चारा असल्यामुळे तो त्यांना खाऊ घालावा . 

शेळी व मेंढीचे प्रजोत्पादन चक्र : 

शेळी मेंढी 

अ.क्र .                     विवरण                                     शेळी                             मेंढी

१.             प्रथम माजावर येण्याचे वय                   ८ ते १० महिने                   ८ ते १० महिने

२.             माज चक्रातील अंतर                           १ ९ ते २१ दिवस                १६ ते १८ दिवस 

३ .            माज टिकून राहण्याचा काळ                १८ ते २४ तास                   २४ ते ३६ तास

४ .          जनावर फळविण्याची योग्य वेळ            माजाचा मधला काळ          माजाचा मधला काळ 

५            सरासरी गाभण काळ                           १५० दिवस                         १५० दिवस

६  ब्याल्यानंतर पुन्हा माजावर येण्यास लागणारा काळ    ३० दिवस                   ३० दिवस  

७ व्याल्यानंतर पुन्हा फळविण्यासाठी योग्य काळ           ६० दिवस                   ६० दिवस

८. दोन वेतातील अंतर ( सरासरी )                      २१० दिवस                            २१० दिवस

१.मेंढी व शेळी ८ वर्षे वयापर्यंत कळपात ठेवावी . नंतर तिची उत्पादन क्षमता कमी होते . म्हणून ती विकून टाकावी किंवा मांसाकरिता वापरावी . नर तीन वर्षापर्यंत कळपात ठेवावा व नंतर काढून टाकावा .

२. मेंढी व शेळीचा निर्बिजकरण केलेला नर कळपात शेळ्या व मेंढ्याचा माज ओळखण्यास वापरावा .

३ व्याल्यानंतर लगेच ६० ते ७० दिवसाच्या आत मेंढी व शेळी पुन्हा फळविता येते . त्यामुळे एका वर्षात दोन वेळा किंवा दोन वर्षात तीन वेळा विण्याची शक्यता असते .

४ उन्हाळ्यातील उष्णतेचा नर आणि मादी यांच्या प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होतो . विशेषतः गर्भधारणेनंतरच्या २५ दिवसात माद्यांना अपाय जास्त होतो . त्याकरिता त्या काळात गाभण माद्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना फक्त सकाळच्या किंवा सायंकाळच्या थंड वेळी चारावे आणि त्याचे उष्णतेपासून संरक्षण करावे .

५ शेळ्या , मेंढ्या यांचे वीर्य आता १ ९ ६ अंश से . शून्याखालच्या तापमानावर वर्षानुवर्ष गोठवून ठेवण्याची प्रक्रिया उपलब्ध झाली आहे . या पद्धतीमुळे ज्या जातीचे आणि जितके वीर्य हवे असेल ते या देशातून किंवा परदेशातून उपलब्ध होऊ शकते . कृत्रिम रेतनाकरिता अशा गोठविलेल्या वीर्याचा उपयोग होतो व त्यायोगे धडधाकट प्रजा उत्पन्न करता येते . कृत्रिम गर्भधारणेच्या वेळेला ठेवलेले वीर्य देखील आता उपयोगात आणल्या जाते .

Leave a Comment