संत्रा फळझाडांवरील रोग व त्यांचे व्यवस्थापन (Diseases of orange fruit trees and their management)

 

फळझाडांवरील रोग व त्यांचे व्यवस्थापन 

संत्रा फळझाडांवरील रोग व त्यांचे व्यवस्थापन
संत्रा फळझाडांवरील रोग व त्यांचे व्यवस्थापन


संत्रा 

१ ) नागपुरी संत्र्याच्या रोपवाटिकेत फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या मुळकूजव्या रोगापासून संरक्षण मिळविण्यासाठी रफ लेमन / जंबेरी किंवा रंगपूर लाईम  या खुंटाचा वापर करावा .

२ ) संत्र्याचे कलम करण्यापूर्वी आणि कलम केल्यानंतर जंबेरी रोपाच्या स्थानांतरानंतर वाफ्यात ०.२ टक्के रिडोमील एम.झेड . ७२ ( २० ग्रॅम + १० लिटर पाणी ) या बुरशीनाशकाची ऑगष्ट , डिसेंबर व जून महिन्यात ड्रेंचीग करून ऑक्टोबर व एप्रिल महिन्यात ०.३ टक्के कॉपर ऑक्सीक्लोराईड ( ३० ग्रॅम + १० लिटर पाणी ) या बुरशीनाशकाची फवारणी करावी .

३ ) संत्रा रोपवाटिकेतील जंबेरी रोपाची सर तसेच वार्षिक तणांचे नियंत्रण करण्यासाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान वाफ्यावर पारदर्शक प्लॅस्टिक कागद ४५ दिवस अंथरुन जमिनीचा सौर ऊर्जा संस्कार करावा आणि अशा वाफ्यात थायरम ( १.५ ग्रॅम ) + कॅप्टन ( १.५ ग्रॅम ) बुरशीनाशक प्रति किलो प्रमाणे चोळून बीज प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे .

४ ) डिंक्या :

या रोगाचा प्रादुर्भाव कलम युतीच्या आसपासच्या भागावर होतो व रोगग्रस्त सालीतून डीक ओघळतांना दिसतो . सालीचा आतील भाग करड्या रंगाचा होतो . सालीचा रंग क्रमाक्रमाने बदलून काळपट / भुरकट होतो . रोगट साल वाळून तिला उभ्या भेगा पडतात . प्रसार हवेद्वारे होतो . रोगग्रस्त झाडाची साल पटाशीने किंवा चाकूने काढून रोगट भाग १ % पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने ( १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ) निर्जंतुक करावा व त्यावर बोडोंमलम लावावा . झाडावर व रोगग्रस्त भागावर रिडोमील एम.झेड . ७२ किंवा एलीएट ०.२ % ( २० ग्रॅम रिडोमील किंवा २० ग्रॅम एलीएट + १० लिटर पाणी ) ची फवारणी करावी .

५) शेंडेमर :

कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली / मागे वाळणे हे प्रमुख लक्षण आहे . फांद्यावरील पाने पिवळी पडतात व गळतात . फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पांढुरका दिसतो व त्यावर सूक्ष्म काळ्या गोल पुटकळ्या दिसतात . प्रसार हवेद्वारे होतो . झाडावरील रोगट व वाळलेल्या फांद्या ( सल ) पावसाळ्यापूर्वी काढून जाळाव्यात . कार्बेन्डाझीम ०.१ % ( १० ग्रॅम + १० लिटर पाणी ) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ०.३ % ( ३० ग्रॅम + १० लिटर पाणी ) किंवा बोडों मिश्रण ०.६ % ची फवारणी करावी व नंतरच्या दोन फवारण्या १५ ते २० दिवसांच्या अंतराने कराव्यात .

६ ) पायकूज आणि मुळकूज :

झाडाचा कलमयुतीचा भाग जमिनीजवळ किंवा जमिनीत गाडल्या गेल्यास तेथे रोगाचा प्रादुर्भाव होऊन तो खोडावर व मुळावर पसरतो . जमिनीलगतच्या बुंध्याची साल कुजते . पाने मलूल होऊन मुख्य शिरा पिवळ्या पडतात आणि पुढे पूर्ण पाने पिवळी पडून गळतात व फळेही गळतात . प्रादुर्भाव व प्रसार जमिनीतून होतो . झाडाची कुजलेली मुळे काढून त्यावर रिडोमिल एम . झेड . ७२ चे ०.२ % ( २० ग्रॅम रिडोमिल + १० लिटर पाणी ) किंवा कॅप्टान ०.४ % चे द्रावण ( ४० ग्रॅम कॅप्टान + १० लिटर पाणी ) टाकावे व मुळ्या मातीने झाकून त्याला हलके ओलीत करावे .

७ ) कोळशी :

काळ्या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर साचलेल्या चिकट द्रवावर काळसर बुरशीची वाढ होते . यालाच ‘ कोळशी ‘ असे म्हणतात . रोगाचा प्रादुर्भाव उष्ण व दमट हवामानात अधिक प्रमाणात दिसून येतो . प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने , फांद्या , फळे व संपूर्ण झाड काळे पडते . याकरिता कार्बेन्डाझीम ०.१ % किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ०.३ % ( १० ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा ३० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड + १० लिटर पाणी ) हे बुरशीनाशक काळ्या / पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या किटकनाशकाच्या पावसाळ्यातील फवारणीमध्ये मिसळावे .

८ ) संत्रा फळाची सड :

वाहतुकीच्या दरम्यान फळे सडतात , सालीवर हिरवी काळी बुरशी वाढते व फळांना आंबट वास सुटतो . निरोगी फळांची प्रतवारी करावी . तसेच विक्रीस तयार फळे ०.१ % बेनोमील किंवा कार्बेन्डाझीमच्या ( १० ग्रॅम बेनोमील किंवा १० ग्रॅम कार्बेन्डाझीम + १० लिटर पाणी ) मिश्रणात बुडवून नंतर विक्रीस पाठवावीत . या प्रक्रियेमुळे संत्री निरोगी व टवटवीत राहतात .

हे पण वाचा :- संत्रा फळझाडांवरील किडी व त्यांचे व्यवस्थापन (Insects on orange fruit trees and their management)

Leave a Comment