वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र
![]() |
साग – वनशेतीच्या दृष्टीने वनवृक्षांच्या लागवडीचे तंत्र |
साग
प्रचलित नाव : साग , सागवान
शास्त्रीय नाव : टेक्टोना ग्रँडीस
हवामान : शुष्क ते दमट , पर्जन्यमान ६३२ ते ५०८० मि.मी.
जमिनीची निवड : जमीन खोल व चांगल्या निचऱ्याची हवी . चिबड जमीन मानवत नाही .
रोपांची लागवड : उन्हाळ्यात खोदून ठेवलेल्या व चांगली माती आणि शेणखताच्या मिश्रणाने भरून ठेवलेला ४५*४५*४५ सें.मी. आकाराच्या खड्ड्यात रोपांची पावसाळ्याच्या सुरूवातीस एक – दोन चांगले पाऊस झाल्यावर लागवड करावी . सागाची लागवड दोन पद्धतीने करता येते . ( १ ) स्टंप लावून ( २ ) पॉलिथीन पिशव्यातील रोपे लावून . स्टंपस्ची लागवड करावयाची असल्यास मृग नक्षत्राचे एक दोन चांगले पाऊस झाल्यावर लगेच करावी . रोपांची लागवड मात्र पावसाळ्यात केव्हाही करता येईल .
रोपातील अंतर : सागाची लागवड २*२ मीटर अंतरावर करावी . या पद्धतीने हेक्टरी २५०० झाडे बसतात .
आंतरमशागत : सुरुवातीच्या २-३ वर्षापर्यंत सागाच्या रोपवनात मूग , उडीद , सोयाबीन , भुईमूग या सारखी पिके घेता येतील . यामुळे पिकाबरोबर सागाची पण मशागत होईल . पिके न घेतल्यास दोन ओळीतील जागा वखरून व खोडाभोवतालचे गवत निंदून स्वच्छ ठेवावे . खोडाभोवतालील अर्धा मीटर त्रिज्येतील माती हलकीशी खोदून माती भुसभुशीत करावी . झाडाच्या लहान वयात खोडावरील कोंब व फांद्या आपले हात पुरेपर्यंत खुडत रहावे व फक्त पाने ठेवावीत . त्यामुळे खोडावर फांद्या न राहता खोड सरळ व फांद्यारहित रहाते व झाडाची उंची वाढते .
ओलीत : सागाला ओलीत दिल्यास त्याची वेगवान वाढ होते . तसेच चांगली मशागत ठेवल्यास सागाचे झाड २० वर्षात कापणीयोग्य होते .
विरळणी : झाडांची २*२ मीटर अंतरावर लागवड केल्याने ती मोठी झाल्यावर दाटतात . त्याकरिता लागवडीनंतर सहा वर्षांनी पहिली विरळणी करावी व ५० टक्के झाडे काढावीत आणि अंतर ४*२ मीटर ठेवावे . दुसरी विरळणी १२ वर्षानंतर करावी व उरलेल्या झाडांपैकी ५० टक्के झाडे काढावीत आणि अंतर ४*४ मीटर ठेवावे . उरलेली ६२५ झाडे शेवटपर्यंत वाढू द्यावीत .
कापणी : वयाच्या २० वर्षानंतर त्यांची पूर्णपणे कापणी करावी . विरळणीमुळे मिळालेल्या बल्ल्याची / फाट्याची बाजारात विक्री करावी अथवा स्वतःच्या उपयोगात आणावीत .
उत्पादन : चांगल्या व्यवस्थापन पद्धतीत २० वर्षानंतर प्रती झाडापासून अंदाजे १० घनफूट लाकूड मिळू शकते .
उपयोग : औद्योगिक वापरात येणारे लाकूड , इमारती लाकूड , फाटे , फर्निचर , प्लायवूड , कुंपणासाठी खांब , नित्योपयोगी वस्तू इत्यादी .
महत्त्वाची बाब : साग , बांबू , शिवन व शिसम हे वनोपज असल्यामुळे त्यांच्या कापणीवर शासकीय बंदी आहे . त्याकरिता लागवडीच्या वर्षी शेतकऱ्यांनी आपल्या खाते पुस्तिकेत / पटवाऱ्याच्या रेकॉर्डमध्ये लागवड केल्याची नोंद करून घेतल्यास पुढे झाडे कापण्याकरिता शासनाची परवानगी मिळविण्यास आणि कापणी व विक्रीस अडचण भासणार नाही .