सूर्यफूल लागवड

 सूर्यफूल लागवड

सूर्यफूल लागवड
 सूर्यफूल लागवड

सूर्यफूल हे महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण तेलबिया पीक असून ते खरीप , रबी व उन्हाळी या तीनहीं हंगामात हमखास येणारे महत्वाचे पीक आहे . खरीप पिकाची पेरणी काही कारणाने लांबली तर अशा वेळी आपत्कालीन दुरुस्ती म्हणून सूर्यफूल योग्य असे पीक आहे . हे पीक पावसाचा ताण बऱ्याच प्रमाणात सहन करू शकते . सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित / संकरीत वाणांचा तसेच प्रगत लागवड तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे .लागवड पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी केली जाते. सध्या याचे प्रमाण कमी असले तरी सूर्यफूल हे एक औषधी वनस्पतीअसून याचे तेल आहारास उत्तम आहे.

 हवामान : 

सूर्यफुलाचे पीक ७०० ते १००० मि.मी. पर्जन्यमान आहे तेथे चांगले उत्पादन देऊ शकते . 

जमीन : 

पाण्याचा चांगला निचरा होणारी , मध्यम ते भारी जमीन निवडावी . सूर्यफुलानंतर सूर्यफुलाचे पीक घेण्याचे शक्यतो टाळावे . 

पूर्वमशागत व भरखते : 

जमिनीची तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी . वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी . शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी ५ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत जमिनीत मिसळावे . 

शिफारशीत वाण / जाती : तिन्ही हंगामासाठी 

संकरीत वाण : पिकेव्हीएसएच २७ , केबीएसएच १ 

शुद्ध वाण : पिकेव्ही एसएफ ९ , मॉर्डन .

बियाण्याचे हेक्टरी प्रमाण : 

( १ ) सरत्याने ८ ते १० किलो 

( २ ) टोकून ५ ते ६ किलो . 

सूर्यफुलाकरिता दुसऱ्या पिढीतील संकरवाणाचे बियाणे वापरू नये

बीज प्रक्रिया : 

पेरणीपूर्वी बियाण्यास प्रती किलो ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी

 पेरणीची वेळ : 

खरीपामध्ये जुलैचा पहिला आठवडा , रबी हंगामात ऑक्टोबरचा दुसरा आठवडा आणि उन्हाळी हंगामात जानेवारी शेवटचा आठवडा ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्या दरम्यान पेरणी करावी . पेरणी झाल्यावर पठाल फिरवून बी झाकून घ्यावे . त्यामुळे एकाच वेळी उगवण होण्यास मदत होईल . 

पेरणीची पद्धत : 

सरत्याने किंवा टोकून . 

आंतरपिके : 

आंतरपिकामध्ये भुईमूग : सूर्यफूल ६ : २ , सूर्यफूल : तूर २ : १ , आणि सोयाबीनः सूर्यफूल २ : १ या प्रमाणात आंतरपिके फायदेशीर आढळून आली आहेत . 

रासायनिक खताची मात्रा व वेळ : 

नत्र , स्फुरद , पालाश किलो / हेक्टर – मॉर्डन ( ४० : ४० : ०० ) , 

पिकेव्हीएसएफ ९ ( ६०:६०:०० ) , पिकेव्हीएसएच २७ ( ८०:६०:०० ) 

शिफारस केलेल्या मात्रेपैकी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे . उरलेले नत्र पेरणीपासून ३०-३५ दिवसांनी ( कळी अवस्थेत ) द्यावे . 

विरळणी : उगवणीनंतर १०-१२ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच जोमदार रोपटे ठेवावे . विरळणीस जास्त उशीर करू नये . विरळणी योग्य वेळी केल्यामुळे हेक्टरी रोपांची अपेक्षित संख्या राहून उत्पादन चांगले मिळते . 

आंतरमशागत : सूर्यफुलास २ -३ वेळा डवरणी ( कोळपणी ) व आवश्यकतेनुसार निंदण करून पीक ४५ दिवसांचे होईस्तोवर तणविरहित ठेवावे . 

तण व्यवस्थापन : तणाच्या नियंत्रणासाठी बासालीन हे तणनाशक पेरणीपूर्वी ०.७५ ते १ किलो क्रियाशील घटक ( २ लि . / हे . ) ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा स्टॉम्प हे तणनाशक पेरणीनंतर लगेच पण उगवणपूर्व १ लिटर / हे . ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे . 

ओलीत व्यवस्थापन : खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास व ओलिताची सोय उपलब्ध असल्यास एक किंवा दोन संरक्षक ओलीत फुलोरा व दाणे भरण्याच्या काळात द्यावे . रबी व उन्हाळी हंगामात सूर्यफूल पिकाला उगवणीच्या वेळी , कळी अवस्थेत , फुलोरा अवस्थेत , दाणे भरण्याचे व परिपक्व होण्याच्या अवस्थांमध्ये ओलीत करावे . 

कापणी व मळणी : पीक परिपक्व झाल्याबरोबर काढणी करावी . पाने पिवळी पडून गळू लागली आणि बी टणक झाले की पीक परिपक्व झाले असे समजावे . फुले कापून पातळ थरात ३-४ दिवस वाळू द्यावीत , मळणी व उफणनी करून बी चांगले वाळवून साठवून ठेवावे . 

हेक्टरी उत्पादन : सर्वसाधारणपणे सुधारित लागवड तंत्राचा वापर केल्यास १० ते १२ क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळू शकते . 

हस्तपरागीकरण : सूर्यफुलातील बी भरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ८ ते ११ च्या दरम्यान एक दिवसाआड हाताला तलम कापड बांधून फुलावरून हळूवार हात फिरवावा . हस्तपरागीकरण शक्य नसल्यास फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स २० ग्रॅम + १० लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फक्त फुलावर फवारणी करावी . 

किडी व त्यांचे व्यवस्थापन 

१ ) तुडतुडे : एका पानावर सरासरी तीन तुडतुडे ( पिल्ले ) ही आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी आढळल्यास मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . फवारणी ऐवजी मॅलॅथिऑन ५ टक्के , मिथाइल पॅरॉथिऑन २ टक्के , क्विनॉलफॉस १.५ टक्के , एन्डोसल्फान ४ टक्के यापैकी एका भुकटीची प्रती हेक्टरी २० किलो प्रमाणे धुरळणी करावी . 

२ ) तंबाखुची पाने खाणारी अळी : अंड्यातून निघालेल्या अळ्या सामुहिकपणे हिरवा भाग कुरतडून खातात . त्यामुळे पाने जाळीदार होतात . जास्त प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या अळ्या फक्त पानाच्या शिराच शिल्लक ठेवतात . अंडीपुंज व जाळीदार पाने अळ्यांसहित काढून नष्ट करावीत .

घाटे अळी व तंबाखुची पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी  फोझेलॉन ३५ टक्के प्रवाही १४ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे अथवा कार्बारील १० टक्के भुकटीची हेक्टरी २० किलो या प्रमाणे धुरळणी करावी . 

३ ) केसाळ अळी : अंड्यातून निघालेल्या अळ्या सामुहिकपणे पानातील हिरवा भाग कुरतडून खातात , म्हणून पाने जाळीदार दिसतात . मोठ्या अळ्या शेतभर पसरतात आणि पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात . अंडीपुंज व जाळीदार पाने अळ्यासहित काढून नष्ट करावीत . त्यांच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही २० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे . 

रोग व त्यांचे व्यवस्थापन 

१ ) पानावरील अल्टरनेरियाचे ठिपके : या रोगाचा प्रसार हवा , बियाणे व जमिनीद्वारे ( जुन्या अवशेषापासून ) होतो . या रोगामुळे पेरणीनंतर साधारणतः एक महिन्याने पानावर तपकिरी रंगाचे गोल ते अनियमित आकाराचे वर्तुळाकार चक्रे किंवा वलये असलेले ठिपके कालांतराने काळपट व आकाराने मोठे होतात . मधील भाग ठिसूळ होऊन गळतो व छिद्रे पडतात . रोगाची तीव्रता जास्त असल्यास बीज धारणा बरोबर होत नाही आणि उत्पन्नात घट येते . पेरणीपूर्वी ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २ ग्रॅम थायरम अधिक १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रती किलो बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया करावी . या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ( डायथेन एम -४५ ) २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी 

२ ) तांबेरा : तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून त्याचा प्रसार हवेद्वारे होतो . रोगाची लागण खरीपापेक्षा रबी हंगामात पीक साधारणपणे ७०-७५ दिवसाचे असतांना होते . पानावर खालच्या बाजूस नारिंगी / तपकिरी रंगाचे फोड येतात व कालांतराने ते काळपट किंवा गर्द करड्या रंगाचे होतात . रोगाची तीव्रता जास्त असल्यास पूर्ण पानावर दोन्ही बाजूस हे ठिपके विखुरलेले असतात . रोगामुळे पाने करपतात , गळून पडतात व बी भरत नाही . बियातील तेलाचे प्रमाण घटते व उत्पन्नात घट येते . त्यासाठी पेरणीपूर्वी ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २ ग्रॅम थायरम अधिक १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रती किलो बियाण्यास चोळून प्रक्रिया करावी . रोग निवारण्याकरिता मॅन्कोझेब ( डायथेन एम -४५ ) २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

Leave a Comment