Table of Contents
सेंद्रिय शेती काळाची गरज
कम्पोस्ट खत तयार करण्याची पद्धत
पिके जमिनीतून अन्नांश शोषण करतात म्हणून जमिनीची सुपीकता टिकविणे आवश्यक आहे . त्यामुळे उपलब्ध कचऱ्यापासून सेंद्रीय खत तयार करून जमिनीला देणे म्हणजेच शेतातून निघालेले सर्व वनस्पतीजन्य पदार्थ परत शेतात टाकणे ही काळाची गरज आहे . सेंद्रीय खतामुळे जमिनीचा कस व जलधारणशक्ती वाढून पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो , जमीन भुसभुशीत होते व त्यामुळे हवा खेळती राहते , नैसर्गिक स्वरूपात अन्न मिळाल्याने पिकांचा जोम वाढतो , तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते . काडी कचऱ्याचा नुसता ढीग घालून खत तयार होत नाही , तर त्यासाठी पुढील बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे .
कम्पोस्ट खड्डयाची जागा व त्याचा आकार
खताच्या खड्याची जागा शक्यतो जनावरांच्या गोठ्याजवळ उंच असावी . पावसाचे पाणी खड्डयात झिरपल्याने कचरा सडतो . त्यासाठी खड्डयाभोवती १०-१५ सें . मी . उंचीचा बांध घालणे चांगले . कचरा कुजण्याची क्रिया सूक्ष्म जीवाणूद्वारे होत असते आणि त्यांची वाढ होण्याकरिता आवश्यक तो ओलावा व उष्णतामान लागते . त्यासाठी गरजेनुसार जवळच पाणी उपलब्ध असावे . पावसाळ्यात पावसाचे पाणी खताचे खड्च्यात जाऊ नये म्हणून त्यावर तात्पुरते ( तुराट्या / पहाट्याचे ) छप्पर / छत असावे .
सर्वसाधारणपणे कम्पोस्ट खड्डा २ मीटर रुंद व १ मीटर खोल असावा . लांबी मात्र आवश्यकतेनुसार ५ ते १० मीटर पर्यंत ठेवावी . दोन खड्च्यांमध्ये २ ते ३ मीटर अंतर असावे . खड्याचा तळ व बाजू थोड्या ठोकून टणक कराव्यात .
कम्पोस्ट तयार करणे :
१. शेतातील काडी कचरा , पाला पाचोळा , तण , गवत , घरातील केर , चुलीतील राख , जनावरांचे शेण , न खाल्लेला मलमूत्र मिश्रित चारा व गोठ्यातील माती , पिकांची धसकटे , गव्हाचे काड इ . पासून कम्पोस्ट तयार करता येते . असा सर्व कचरा एका जागी गोळा करावा . शक्यतो टणक फांद्या , पहाट्या , तुराट्याचे जमतील तेवढे लहाने तुकडे करावेत . त्यामुळे कुजण्याची क्रिया जलद होते . ( टणक पदार्थाचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा जास्त नसावे . )
२. कचऱ्यातून दगड , विटा , कांचेचे / लोखंडाचे तुकडे , प्लॅस्टिकच्या पिशव्या इत्यादी न कुजणाऱ्या वस्तू वेगळ्या कराव्यात .
३. फार ओले तण किंवा वनस्पती १-२ दिवस मोकळ्यावर ठेवून वाळू द्यावी .
४. अशा रितीने साठलेला केरकचरा भरण्यापूर्वी चांगला मिसळून घ्यावा व त्याचे थरावर थर रचून खड्डा भरावा . पहिला थर अंदाजे ३० सें . मी . जाडीचा भरून चांगला दाबावा . त्यावर कचरा ओलसर होईल एवढे युरिया व सुपर फॉस्फेटचे द्रावण आणि पाणी टाकावे म्हणजे अंदाजे ६० टक्के ओलावा त्यात राहील . ह्यासाठी अंदाजे ५-६ बादल्या ( ४० लिटर ) पाण्यात १ किलो युरिया किंवा २ ते २.५ किलो अमोनियम सल्फेट अधिक २ किलो सुपर फॉस्फेट मिसळून ते द्रावण शिंपडावे . जुने शेणखत उपलब्ध असल्यास तेही ( १ घमेले ) द्रावणात मिसळावे . कुजण्याच्या क्रियेत भाग घेणारे सूक्ष्म जीवाणू आता कल्चरच्या स्वरूपात बंद पाकिटातून अल्प किंमतीस उपलब्ध आहे . त्यांचा वापर करावा . त्यामुळे खत तयार होण्यास लागणाऱ्या वेळेत बचत होते . एक टन काडी कचऱ्यासाठी १ पाकीट ( ५०० ग्रॅम ) ह्या प्रमाणात कल्चरचा वापर पाण्यात मिसळून प्रत्येक थरानंतर करावा .
रासायनिक खताच्या द्रावणात कल्चर टाकू नये .
स्फुरदाच्या वापरामुळे खताची प्रत सुधारते , तर नत्राच्या वापराने कचऱ्यातील कर्ब : नत्र यांचे प्रमाण योग्य राहून जीवाणूंची संख्या वाढते . त्यामुळे खत लवकर तयार होऊन , खतातील नत्राचे प्रमाण वाढते .
अशा रितीने थर रचून खड्डा जमिनीच्या वर ३० ते ६० सें . मी . इतका भरावा . संपूर्ण खड्डा कोरड्या मातीने अथवा शेणमातीने जाड थर देऊन झाकावा , म्हणजे आतील ओलावा कायम राहील . एक ते दीड महिन्यानंतर कचऱ्याची पातळी खाली जाते . त्यावेळी वरची माती बाजूला करून वरील प्रमाणेच काडी कचरा भरून पुन्हा खड्डा बंद करावा . अशा रितीने खड्डा भरल्यास साधारणपणे १६ ते ३० आठवड्यात चांगले कम्पोस्ट खत तयार होते . खड्डा भरण्याचे काम ५-६ दिवसात पूर्ण करावे . ( टीप : उसाच्या पाचटापासून सुद्धा चांगल्या प्रकारचे कम्पोस्ट खत तयार करता येते . )
कम्पोस्ट खत तयार झाले किंवा नाही हे ओळखणे ?
वरील पद्धतींचा अवलंब करून कम्पोस्ट खत केल्यास ते पूर्ण कुजून तयार झाले किंवा नाही ते पुढील चांचण्या घेऊन ठरविता येते .
१. खड्डयातील खताचे आकारमान कमी होऊन ३० ते ६० टक्क्यांपर्यंत येते .
२. उत्तम कुजलेले खत मऊ होते व सहज कुस्करले जाते .
३. खताचा रंग तपकिरी किंवा गर्द काळा होतो .
४. खताचे खड्ड्यांत हात घालून पाहिल्यास आतील उष्णतामान कमी झालेले दिसते .
५. चांगल्या कुजलेल्या खतास दुर्गंधी येत नाही .