सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान

 

सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान

सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान

मध्यवता प्रात्याक्षक नियोजनपूर्वक शेतीत सोयाबीन आशादायी पीक आहे .

 सोयाबीन द्विदलवर्गीय पीक असल्यामुळे त्याच्या मुळावरील गाठीस लागणारे जीवाणु हवेतील नैसर्गिक नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी नत्र उपलब्ध करून देते . 

सोयाबीन झाडाचा पालापाचोळा ( अवशेष ) जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते . आंतरपिक व दुबार पीक पध्दतीत सोयाबीन एक अतिशय उपयुक्त असे पीक आहे . 

पिकाच्या फेरपालट मध्ये सोयाबीनला महत्वाचे स्थान आहे .

 

बिजोत्पादनाच्या तांत्रिक बाबी : 

पायाभुत बियाणे : 

बिजोत्पादनासाठी लागणारे बियाणे बिजोत्पादकांनी डॉ . पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ , अकोला , कृषि विभाग , अगर बीज प्रमाणिकरण यंत्रणा यांची मान्यता दिलेल्या संस्थेकडून घेतले पाहिजे अन्यथा प्रमाणिकरण केले जात नाही .

 

क्षेत्राची निवड : 

बीज प्रमाणिकरण अधिकाऱ्यांना ठरविक वेळी क्षेत्र तपासणी करणे सुलभ व्हावे , बिजोत्पादकाला वेळोवेळी तांत्रिक सल्ला देणे सोपे व्हावे याकरीता बिजोत्पादन क्षेत्र सलग असावे . क्षेत्र शक्यतो रस्त्याच्या कडेला असावे . त्याप्रमाणे प्रस्तावित बिजोत्पादन क्षेत्रामध्ये मागील वर्षी सोयाबीन किंवा अन्य जातीचे सोयाबीन पीक नसावे .

 बिजोत्पादन क्षेत्रामध्ये पुर्वीच्या हंगामात घेतलेल्या पिकाची झाडे असू नयेत . तसेच तणाचा नायनाट करावा . पेरणीनंतर तणांचा प्रादुर्भाव झाल्यावर तणे फुलावर येण्यापूर्वी काढून टाकावीत .

 पूर्वमशागत : 

जमिनीची १५ ते २० सें.मी. खोल नांगरटी तीन वर्षातून एकदा करून व दोन ते तीन वखराच्या पाळ्या देवून जमीन भूसभुशीत व समपातळीत करावी . हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत व्यवस्थीत मिसळण्यासाठी वखराची पाळी द्यावी . 

पेरणीपूर्वी एक वखराची पाळी ( जांभूळवाही ) लिी असता तणांची तीव्रता कमी होते . 

बीज प्रक्रिया : 

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम अथवा २ ग्रॅम थायरम अधिक १ ग्रॅम कार्बेन्डाझिम याप्रमाणे बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीज प्रक्रिया करावी आणि ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात लावावे . 

सुधारीत वाण : 

जेएस -३३५ , एन.आर.सी. – ३७ ( अहिल्या -४ ) , जे.एस – ९ ३०५ , एम.ए.यु.एस. – ७१ , एम.ए.एफ.एस -८१ , जे.एस. ९७-५२ इत्यादी सुधारीत वाणांचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यातयावा . 

जीवाणु खते :

 रायझोबियम जॅपोनिकम व पीएसबी प्रत्येकी २०० २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी २ ते ३ तास अगोदर लावून सावलीमध्ये वाळवावे . बीज प्रक्रिया करतांना बियाणे जोरात चोळू नये . तसेच प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतरच जीवाणु खतांची प्रक्रिया करावी . 

पेरणीची वेळ व पध्दत : 

पुरेसा मान्सुनचा पाऊस ( ७५ ते १०० मि.मी. ) झाल्यानंतर जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या दरम्यान पेरणी आटोपावी . १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादन कमी होते . पेरणी सरत्याने करावी . 

तिफणीचा वापर टाळावा . पेरणी करतांना पट्टा पध्दत वापरावी . सोयाबीनचे बियाणे ४ सें.मी. पेक्षा खोल पेरू नये . अन्यथा बियाणे कुजून उगवण कमी होते . 

दोन ओळीतील व रोपट्यामधील अंतर ३०४८ सें.मी. किंवा ४५ x ५ सें.मी. ठेवावे . जेणे करून रोपांची संख्या हेक्टरी ४ ते ४.५ लाख एवढी राहील . उताराला आडवी पुर्व – पश्चिम पेरणी करावी . 

बियाण्याचे प्रमाण :

 किमान ७० टक्के उगवण शक्तीचे प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे . स्वतः जवळचे बियाणे वापरावयाचे असल्यास घरच्या घरी उगवणशक्ती तपासून नंतरच पेरणी करावी . 

खत व्यवस्थापन : 

रासायनिक खताची संपूर्ण खत मात्रा ३० किलो नत्र व ७५ किलो स्फुरद , ३० किलो पालाश पेरणी सोबतच द्यावी . एकिकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनेच्या दृष्टीने पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी ५ टन चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे . 

बियाण्यास जीवाणु खतांची बीज प्रक्रिया करावी आणि पेरणी सोबत रासायनिक खतांची अर्धी मात्रा १५ किलो नत्र , ३७.५ किलो स्फुरद व १५ किलो पालाश द्यावे . एकिकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यास मदत होते . 

माती परिक्षणानुसार आवश्यकता भासल्यास ३० किलो पालाश द्यावे व सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीतून अथवा जमिनीतून द्यावे . 

आंतरमशागत : 

डवरणीच्या दोन पाळ्या द्याव्या , पहीली डवरणी पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी व दुसरी डवरणी ३० ते ३५ दिवसाच्या दरम्यान आणि आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदण द्यावे . दुसऱ्या डवरणीच्या वेळी डवऱ्याला दोरी गुंडाळून डवरणी करावी . यामुळे पिकाच्या रांगेला मातीची भर बसेल आणि सऱ्या पडल्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होईल . 

सोयाबीनचे अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शिफारस केलेल्या खतमात्रे सोबत पेरणी नंतर ५० व ७० दिवसांनी २ टक्के ( १०० लिटर पाण्यात २ किलो युरिया ) युरियाची फवारणी करावी . 

तण नियंत्रण ( पेरणीपूर्व ) : 

फ्लुक्लोरॅलीन ( बासालीन ४५ % ) १ किलो क्रि.घ. / हे . ( २ लि . / हे . ) तणनाशक ६००-७०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीत मिसळून द्यावे . उगवण पश्चात : उगवण पश्चात १० दिवसांनी इमॅजिथायपर ७५ ग्रॅम क्रि.घ. / हे . फवारणी करून पेरणी नंतर २५ दिवसांनी एक डवरणी करून प्रभावीपणे तण नियंत्रण करता येईल . ( संयुक्त कृषि संशोधन विकास समिती अंतर्गत शिफारस )

 उगवणपूर्व : 

पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर पृष्ठभागावर येण्याआधी मेटाक्लोर ( ड्युल ५० % ) १ किलो क्रि.घ. / हे . ( २ लि . / हे . ) किंवा पेंडिमेथलीन ( स्टॉम्प ३० % ) ४ लि . / हे . ची वरील प्रमाणे फवारणी करावी . विलगीकरण अंतर : बिजोत्पादन क्षेत्र सोयाबीनच्या दुसऱ्या जातीच्या क्षेत्रापासून किंवा त्याच जातीच्या परंतु शुध्दतेचे प्रमाणिकरण किंवा खात्री नसलेल्या क्षेत्रापासून तसेच पायाभूत बिजोत्पादनाकरीता शेताच्या चारही बाजुकडे ( ५.० ) मीटर ठेवावे अन्यथा बिजोत्पादन क्षेत्र नापास होऊ शकते . 

क्षेत्र तपासणी : 

बीज प्रमाणिकरण अधिकाऱ्याकडून कमीत कमी तीन वेळा क्षेत्र तपासणी केल्या जाते . पहिली तपासणी फुले येण्यापूर्वी केली जाते . या वेळी क्षेत्रामध्ये ज्या वाणाचे बिजोत्पादन शेतकरी घेत आहे तोच वाण आहे किंवा नाही , पेरलेले बियाणे योग्य दर्जाचे आहे किंवा नाही , 

( पिशवी व प्रपत्रावरून ) याची शहानिशा करण्याच्या दृष्टीने केली जाते तर याच वेळी बिजोत्पादन क्षेत्रामध्ये असलेली इतर पिकांची , वाणांची तसेच किडग्रस्त , रोगग्रस्त झाडे काढून टाकणे नियमानुसार आवश्यक आहे .

 दुसरी तपासणी पीक फुलोऱ्यात येतांना व फुलोरा अवस्थेमध्ये भेसळ काढून टाकण्याच्या दृष्टीने केली जाते . 

तिसरी तपासणी पीक परीपक्वतेच्या वेळी परंतु पीक कापणीपूर्वी केली जाते . 

भेसळ काढणे : 

बियाण्याची अनुवांशिक शुध्दता राखण्याच्या दृष्टीने भेसळ काढणे अत्यंत महत्वाचे आहे . भेसळ काढण्याचे काम फुले येण्यास । सुरूवात झाल्याबरोबर चालु करून बहुतेक सर्व झाडे फुलावर येवून भेसळ राहली नाही याची खात्री पटेपर्यंत करीत राहणे , फुलांचा रंग , झाडांची वाढ हे प्रामुख्याने भेसळ ओळखण्याच्या व भेसळ काढणीस कामी येणारे प्रमुख गुणधर्म होय . 

कापणी : 

पाने पिवळी पडून गळू लागतात व शेगांचा रंग भुरकट तांबूस किंवा काळपट होतो . तेव्हा पीक कापणीस आले आहे असे समजावे . कापणी वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ ते १७ टक्के असावे . कापणीनंतर पीक ताबडतोब खळ्यावर ठेवावे . जेणे करून पावसापासून पिकांचे संरक्षण होईल व बियाण्याची प्रत खराब होणार नाही

 . मळणी : 

सोयाबीनची मळणी करतांना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १३ ते १५ टक्के असावे आणि मळणी यंत्राच्या ड्रमची गती ३५० ४०० फेरे प्रति मिनिट ( आरपीएम ) या दरम्यान असावी जेणे करून बियाण्याला इजा होणार नाही आणि उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होणार नाही . ।

Leave a Comment